Author: kulkarni.dsuraj26@gmail.com

  • जेव्हा स्मार्ट साधने मुलांना कमी ‘माणूस’ बनवतात : मुलांच्या आयुष्यातील AI चा काळा पैलू

    #AIAndKids #DigitalWellbeing #ParentingInAI #ScreenTimeAwareness #FutureGeneration #HumanFirst #ResponsibleAI #MentalHealthMatters

    “AI ही आग किंवा वीज यापेक्षाही शक्तिशाली ठरू शकते—पण आपण तिला शहाणपणाने नियंत्रित केल्यासच,” असे एका प्रसिद्ध AI शास्त्रज्ञाने म्हटले आहे. आज मुलांच्या आयुष्यात AI-आधारित साधने जितक्या वेगाने शिरत आहेत, ते पाहता हे वाक्य अधिकच महत्त्वाचे वाटते. स्मार्ट असिस्टंट्स, AI-आधारित शैक्षणिक अ‍ॅप्स, खेळ आणि सोशल मीडिया यामुळे मुलांचे विचार, शिकण्याची पद्धत आणि वागणूक बदलत आहे. प्रश्न AI असण्याचा नाही, तर मुलांचे त्यावर वाढते अवलंबन हा खरा मुद्दा आहे.

    AI साधनांचा अतिरेक झाल्याने मुलांमध्ये सर्जनशीलतेचा ऱ्हास होत आहे. गोष्टी लिहिणे, चित्र काढणे, उत्तरे शोधणे हे सर्व AI लगेच करून देते. त्यामुळे “मी कसे विचार करतो?” याऐवजी “कोणते टूल हे करून देईल?” असा विचार सुरू होतो. हळूहळू स्वतःचा विचार करण्याची सवय कमी होते. चुका करून शिकण्याची प्रक्रिया थांबते आणि कल्पकता हरवू लागते.

    AI-आधारित अ‍ॅप्स मुलांना जास्त वेळ गुंतवून ठेवण्यासाठीच डिझाइन केलेली असतात. त्यामुळे स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढतो. अभ्यासासाठी सुरू केलेला मोबाईल कधी व्हिडिओ, गेम्स आणि रील्सकडे वळतो हे कळतही नाही. याचा परिणाम झोप, एकाग्रता आणि वागणुकीवर होतो. मोबाईल दूर केला की चिडचिड आणि अस्वस्थता दिसून येते.

    यामुळे खऱ्या जगाशी संवाद कमी होतो. आई-वडील, भावंडे, मित्र यांच्याशी बोलण्याऐवजी मुले स्क्रीनशी जास्त जोडली जातात. भावना व्यक्त करणे, समोरच्याचे ऐकून घेणे, मतभेद हाताळणे ही कौशल्ये कमी होतात. AI शी संवाद सोपा असतो, पण माणसांशी संवाद भावनिक आणि गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे मुलांना खरे नातेसंबंध अवघड वाटू लागतात.

    AI वर अवलंबून राहिल्यामुळे मानसिक ताण आणि आत्मविश्वासाचा अभाव वाढतो. स्वतः विचार न करता उत्तर मिळण्याची सवय लागते. काही विद्यार्थी परीक्षेत घाबरतात, कारण AI शिवाय त्यांना खात्री वाटत नाही. आयुष्यात अपयश आले की ते कसे स्वीकारायचे, कसे उभे राहायचे हे कळत नाही. भावनिक सहनशक्ती कमी होते.

    शारीरिक आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतो. स्क्रीन वाढली की खेळ, मैदानी उपक्रम आणि शारीरिक हालचाल कमी होते. यामुळे लठ्ठपणा, डोळ्यांचे त्रास, चुकीची शरीर ठेवण आणि थकवा वाढतो. खेळांमुळे शिस्त, संघभावना आणि पराभव स्वीकारण्याची सवय लागते. हे अनुभव न मिळाल्यास आयुष्यातील कठीण निर्णय घेताना अडचणी येतात.

    गोपनीयता आणि डेटा सुरक्षितता हा अजून एक गंभीर मुद्दा आहे. अनेक AI अ‍ॅप्स मुलांचा आवाज, फोटो, शिकण्याची पद्धत आणि वैयक्तिक माहिती साठवतात. काही प्रत्यक्ष घटनांमध्ये मुलांचा डेटा लीक झाल्याची उदाहरणे आहेत. एकदा डेटा इंटरनेटवर गेला की त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. यामुळे भविष्यात ओळख चोरी किंवा गैरवापर होण्याचा धोका असतो.

    या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे आणि कुटुंबासोबत मोबाईल-मुक्त वेळ घालवणे आवश्यक आहे. AI पूर्णपणे बंद न करता त्याचे फायदे-तोटे मुलांना समजावून सांगावेत. मुलांना स्वतः विचार करायला, प्रश्न विचारायला आणि चुका करायला मोकळीक दिली पाहिजे. AI हे साधन असावे, विचारांचा पर्याय नव्हे.

    शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की AI शक्तिशाली आहे, पण बालपण अनमोल आहे. जर मुलांचे आयुष्य माणसांपेक्षा अल्गोरिदमने अधिक चालवले, तर समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. तंत्रज्ञान, खेळ, सर्जनशीलता आणि मानवी नाते यांचा समतोल राखणे हाच खरा उपाय आहे. भविष्य AI-सहाय्यक असावे, AI-नियंत्रित नव्हे.

    या लेखाबद्दल तुमचे मत काय आहे? तुमच्या घरात किंवा शाळेत तुम्ही असे बदल अनुभवले आहेत का? AI आणि मुलांचे भविष्य याबद्दल तुमचे विचार, शंका आणि अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा. कारण चर्चा झाली, तरच दिशा ठरते… आणि दिशा ठरली, तरच भविष्य घडते.

    • प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी, M.E. (E&TC Engg), C-DAC,

  • आम्ही नेटकरी : डिजिटल भारताची नवी ओळख

    हातात मोबाईल, डोळ्यांत भविष्य – हाच आजचा नेटकरी!”

    “ज्ञान जेव्हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते, तेव्हाच राष्ट्र प्रगती करते.” – A. P. J. Abdul Kalam

    आजचा माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इंटरनेटशी जोडलेला आहे. अलार्म बंद करण्यापासून ते बातम्या वाचणे, व्हॉट्सॲप संदेश पाहणे, ऑनलाइन पैसे भरणे, नकाशावरून मार्ग शोधणे किंवा व्हिडिओ पाहणे – आपले दैनंदिन जीवन इंटरनेटशिवाय अपूर्ण वाटू लागले आहे. म्हणूनच आज आपण स्वतःला अभिमानाने “नेटकरी” म्हणू शकतो. भारतामध्ये सध्या ९५८ दशलक्ष (९५.८ कोटी) सक्रिय इंटरनेट वापरकर्ते आहेत.

    पूर्वी इंटरनेटचा वापर मुख्यतः शहरांपुरता मर्यादित होता. मात्र आता गावागावांत मोबाईल आणि इंटरनेट पोहोचले आहे.ग्रामीण भारताचा वाटा ५७% असून, सुमारे ५४८ दशलक्ष सक्रिय इंटरनेट वापरकर्ते ग्रामीण भागातून आहेत. शेतकरी मोबाईलवरून हवामानाचा अंदाज पाहतो, बाजारभाव तपासतो. विद्यार्थी ऑनलाइन वर्ग, व्हिडिओ व्याख्याने आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. गृहिणी ऑनलाइन खरेदी करते, तर ज्येष्ठ नागरिक व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या नातवंडांशी बोलतात. इंटरनेट आता केवळ करमणुकीचे साधन न राहता जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

    आज इंटरनेटचा वापर करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. लिहिण्याऐवजी आपण बोलून शोध घेतो, फोटोच्या आधारे माहिती मिळवतो, चॅटबॉट्सशी संवाद साधतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुविधा हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः तरुण पिढी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसते.२०२५ या कॅलेंडर वर्षात भारतातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये वर्षागणिक ८% वाढ झाली आहे.

    शॉर्ट व्हिडिओ, रील्स आणि लघु माहितीपर व्हिडिओ हे आजच्या पिढीचे आवडते माध्यम बनले आहे. काही मिनिटांत माहिती, मनोरंजन आणि शिक्षण मिळत असल्यामुळे हा प्रकार लोकप्रिय होत आहे. याचबरोबर ऑनलाइन खरेदी, झटपट वस्तूंची सेवा, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा व्यवसायही वाढत आहे. त्यामुळे इंटरनेटमुळे नवे व्यवसाय, नवी रोजगाराची दारे उघडत आहेत.२०२५ मध्ये शहरी भागातील २३० दशलक्ष (५६%) सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांनी ऑनलाइन खरेदी केली.

    तरीही एक वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे. अजूनही देशातील काही लोक इंटरनेटपासून दूर आहेत. इंटरनेट साक्षरतेचा अभाव, साधनांची कमतरता किंवा योग्य मार्गदर्शन नसणे ही त्यामागची कारणे आहेत. मात्र ही दरी हळूहळू कमी होत असून, भविष्यात अधिकाधिक लोक डिजिटल प्रवाहात सामील होतील, अशी आशा आहे.

    एकूणच, इंटरनेटने आपल्या जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, प्रशासन – प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा प्रभाव वाढत आहे. योग्य वापर, जागरूकता आणि सुरक्षितता यांची सांगड घातली तर डिजिटल भारताचा हा प्रवास अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक होऊ शकतो.

    आज आपण केवळ इंटरनेट वापरणारे नाही, तर डिजिटल बदलाचे साक्षीदार आहोत. खरंच, आम्ही नेटकरी – नव्या भारताचे शिल्पकार! आपल्याला हा लेख कसा वाटला? इंटरनेट आपल्या जीवनात कसा बदल घडवत आहे, याविषयी आपले मत, अनुभव किंवा सूचना आम्हाला नक्की कळवा.

    – प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी, M.E. (E&TC Engg), C-DAC, सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे

    #आम्हीनेटकरी
    #डिजिटलभारत
    #नवभारत
    #इंटरनेटयुग
    #डिजिटलजीवन
    #ग्रामीणभारत
    #तंत्रज्ञान
    #AIIndia
    #DigitalIndia
    #ConnectedIndia
    #TechForAll
    #FutureIndia

  • माझे वडील – माझे गुरु

    “नास्ति विद्या समं चक्षुः, नास्ति सत्य समं तपः ।

    नास्ति राग समं दुःखं, नास्ति त्याग समं सुखम् ॥”

    अर्थ : विद्या समान डोळे नाहीत, सत्यासारखं तप नाही, आसक्तीसारखं दुःख नाही आणि त्यागासारखं सुख काहीच नाही.

    माझ्या आयुष्यात त्याग, सत्य आणि कर्तव्य यांचा जिवंत अर्थ मला ज्यांनी शिकवला, ते म्हणजे माझे वडील—माझे गुरु.

    माझे वडील श्री दिलीप शंकरराव कुलकर्णी यांचा जन्म १९५५ साली लातूर जिल्ह्यातील एकुर्गा या छोट्या गावात झाला. आई पार्वतीबाई गृहिणी तर वडील शंकरराव शिक्षक. साधं जीवन, कष्टाची सवय आणि प्रामाणिकपणा हे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. तीन बहिणी आणि एक भाऊ अशा कुटुंबात वाढताना जबाबदारीची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली. आम्ही त्यांना बाबा म्हणतो—कारण ते फक्त वडील नाहीत, तर आधारस्तंभ आहेत.

    बारावीपर्यंत शिक्षण लातूरमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी बी.कॉम.चे शिक्षण सुरू केले. मात्र घरची परिस्थिती आणि भावंडांचे शिक्षण यासाठी त्यांनी स्वतःचं शिक्षण अर्ध्यावर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. हा निर्णय त्यागाचा होता, पण त्यामागे कुटुंब उभं राहावं हा ठाम विचार होता. त्यानंतर त्यांनी शेती स्वीकारली. ऊन, पाऊस, दुष्काळ—कशालाही न घाबरता त्यांनी शेतीत अपार कष्ट घेतले. शेती ही केवळ उपजीविका नसून संस्कार आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवलं.

    १९८६ साली त्यांचा विवाह माझ्या आईसोबत झाला. आईने त्यांच्या प्रत्येक संघर्षात खंबीर साथ दिली. १९९० च्या सुमारास आजोबांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बाबांवर आली. उरलेल्या बहिणींची आणि भावाची लग्नं लावून देत त्यांनी वडीलबंधू म्हणून आपलं कर्तव्य निष्ठेने पार पाडलं. त्या काळात स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी उभं राहणं म्हणजे काय, हे त्यांनी आम्हाला शिकवलं.

    मी आणि माझा मोठा भाऊ सागर—दादा—दोघे भिन्न स्वभावाचे. दादा खोडकर, मी शांत. पण संस्कार मात्र एकसारखे. १९९७ साली आमचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून आई-वडिलांनी गाव सोडून शहर गाठलं. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी कधी तक्रार केली नाही. “आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं,” एवढाच त्यांचा ध्यास होता.

    १९९५ च्या काळात बाबांनी आईला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या काळात ग्रामीण भागात हा निर्णय धाडसी होता. यातून त्यांचा आधुनिक आणि दूरदृष्टीपूर्ण विचार दिसतो. मुरुडमध्ये तब्बल आठ वर्षे राहून त्यांनी आम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजावलं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आयुष्याची दिशा बदलू शकते, हा धडा आम्हाला तेव्हाच मिळाला.

    पुढे दादा कोल्हापूरला जाऊन मूकबधिर शिक्षण विषयातील पदविका प्राप्त करून लातूरच्या एमआयटी कॉलेज व हॉस्पिटलमध्ये रुजू झाला. मी बारावीनंतर पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलो. पदवी पूर्ण झाल्यावर एम.टेक.साठी बाबांनी मला पुन्हा एकदा प्रोत्साहन दिलं. “शिक्षणात कधीही थांबू नकोस,” हे त्यांचं वाक्य आजही माझ्या मनात कोरलेलं आहे.

    मी रायगडमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो तेव्हा बाबांनी स्वतः येऊन माझ्या राहण्याची व्यवस्था केली. सगळं नीट सुरू झालंय याची खात्री झाल्यावरच ते परतले. पुढे हैदराबादमध्ये सी-डॅक कोर्स, नांदेडची नोकरी आणि माझं लग्न—या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा कष्टाचा प्रवास सुरूच होता. वय वाढलं, पण जबाबदारीची भावना कधीच कमी झाली नाही.

    आजही वयाच्या सत्तरीत बाबांची काम करण्याची जिद्द तशीच आहे. वेळ वाया घालवणं त्यांना जमत नाही. खर्च लिहून ठेवणं, बचतीची सवय, शिस्त, संयम, निर्व्यसनशीलता, देवावर अढळ श्रद्धा—हे सारे गुण त्यांनी आम्हाला दिले. त्यांनी सुनांनाही मुलीप्रमाणे वागवलं आणि नातवांवरही तेवढंच प्रेम केलं. गरज पडली तेव्हा शिस्तीचा कठोर धडा देण्यासही ते मागे हटले नाहीत—कारण त्यामागे आमचं भलं होतं.

    आज आमची शेती चांगल्या पद्धतीने विकसित होत आहे. मी आणि दादा दोघेही सन्माननीय पदावर कार्यरत आहोत. हे सर्व बाबांच्या आयुष्यभराच्या कष्टांचं फलित आहे. त्यांनी कुटुंब, समाज आणि नातेसंबंध यांचा एक आदर्श उभा केला आहे.

    “Character is doing the right thing when nobody is watching.” — C. S. Lewis

    अर्थ: कोणीही पाहत नसताना योग्य काम करणे हेच चारित्र्य होय.

    हे वाक्य जणू त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगतं. माझ्या वडिलांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो—हीच देवचरणी प्रार्थना.

    प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी, M.E. (E&TC Engg), C-DAC, सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे

  • रामायण : आजच्या पिढीसाठी जीवनमार्गदर्शक

    रामायण, श्रीराम, भारतीय संस्कृती, आजची पिढी, मूल्यशिक्षण, धर्म, समाज, मराठी ब्लॉग

    साधने वाढली, पण संस्कार कमी झाले का?

    आज माणसाकडे सुविधा, तंत्रज्ञान आणि साधने प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र त्याच वेळी संयम, संस्कार आणि नैतिक मूल्ये कमी होत चालली आहेत का, असा प्रश्न सतत मनात उभा राहतो. समाजात हिंसाचार वाढत आहे, चोरी-फसवणूक सामान्य होत आहे आणि माणसामाणसांतील विश्वास कमी होत चालला आहे. प्रेम, करुणा आणि दया यांसारखी मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित राहिल्यासारखी वाटतात.

    आजचा समाज आणि बदलती मूल्यव्यवस्था


    कर्तव्य, प्रामाणिक प्रयत्न आणि शब्दाला दिलेली किंमत यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. लालच, ईर्ष्या, क्रोध आणि राग यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे चांगले विचार पसरतात, तसेच वाईट प्रवृत्तीही वेगाने वाढत आहेत. याचा थेट परिणाम समाजमनावर, विशेषतः तरुण पिढीवर होत आहे.

    रामायण : केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे

    अशा परिस्थितीत रामायण हा ग्रंथ केवळ धार्मिक न राहता एक प्रभावी जीवनमार्गदर्शक ठरतो. रामायण हे मर्यादा, कर्तव्य, त्याग आणि धर्म यांवर आधारित आहे. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये रामायण वाचले जाई; आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टीव्ही, पुस्तके आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही त्यातील विचार आत्मसात करता येतात.

    श्रीरामांचे जीवन : मर्यादा आणि कर्तव्य

    श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. पित्याच्या आज्ञेसाठी वनवास स्वीकारताना त्यांनी दाखवलेला संयम आणि कर्तव्यनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. वडिलांप्रती आदर, आईप्रती प्रेम, गुरूंच्या आज्ञेचे पालन आणि भावांशी असलेले स्नेहपूर्ण नाते हे आजच्या कुटुंबव्यवस्थेसाठी आदर्श ठरू शकते.


    तरुण पिढीसाठी श्रीरामांचे संदेश


    आजचा तरुण झटपट यश, दिखावा आणि स्पर्धेच्या मागे धावत असताना श्रीरामांचे जीवन संयम, शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे हीच खरी परिपक्वता आहे, हे रामायणातून स्पष्ट होते.

    स्त्री-सन्मान आणि सामाजिक संदेश

    रामायणातील अत्यंत महत्त्वाची शिकवण म्हणजे स्त्रियांचा सन्मान. सीतामातेचे धैर्य, सहनशीलता आणि आत्मसन्मान आजच्या स्त्रीसाठी प्रेरणादायी आहेत. रावणाचा विनाश हा स्त्री-अवमानाचे दुष्परिणाम किती भयावह असू शकतात याचे ठळक उदाहरण आहे. आजच्या समाजात स्त्री-सन्मान हा केवळ विचार न राहता आचरणात आणण्याची गरज आहे.

    आदर्श राजधर्म आणि प्रशासन

    श्रीराम हे एक आदर्श राजा आणि कुशल शासक होते. त्यांनी वैयक्तिक भावना बाजूला ठेवून नेहमी राजधर्म पाळला. राज्याच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी मोठे त्याग केले. आजच्या प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आदर्श अत्यंत उपयुक्त आहे.

    मैत्री, भक्ती आणि निष्ठा

    रामायणात मैत्री आणि निष्ठेचे सुंदर दर्शन घडते. सुग्रीव व विभीषण यांच्याशी श्रीरामांनी केलेले वर्तन आपल्याला शिकवते की शत्रूमध्येही चांगले गुण ओळखले पाहिजेत. हनुमानाची श्रीरामांवरील निष्ठा आणि समर्पण हे निस्वार्थ सेवेचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

    बालसंस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास

    रामायणाचा प्रभाव लहान वयात पडल्यास मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण सकारात्मक होते. विश्वास, प्रेम, संयम आणि करुणा यांमुळे मानसिक समाधान मिळते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते.

    कौटुंबिक जीवनासाठी रामायण

    श्रीराम आणि सीतामातेतील परस्पर विश्वास, निष्ठा आणि त्याग हे आदर्श कौटुंबिक जीवनाचे प्रतीक आहे. अशा मूल्यांमुळे कुटुंबातील वातावरण सुसंवादी राहते आणि समाज अधिक सुदृढ बनतो.


    आजच्या काळाची खरी गरज


    रामायण वाचणे ही श्रद्धा आहे; पण त्याचे आचरण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आजच्या पिढीने रामायणातील मूल्यांचे अनुकरण केल्यास व्यक्ती, कुटुंब आणि समाज नक्कीच अधिक सुसंस्कृत, स्थिर आणि समृद्ध बनेल.

    तुम्हाला हा लेख आवडला असल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा. लेख उपयुक्त वाटल्यास इतरांपर्यंत जरूर पोहोचवा.

    – सुरज दिलीपराव कुलकर्णी

    #Ramayan

  • कार्बन उत्सर्जन, नवीकरणीय ऊर्जा आणि आपली भूमिका

    #ClimateChange, #CarbonEmission, #RenewableEnergy, #SustainableLiving, #GreenIndia

    आपण आज निसर्गाशी कसे वागतो, यावर उद्याचे भविष्य ठरते.”-डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

    आपण आज ज्या हवामान बदलांचा सामना करत आहोत—अचानक पूर, तीव्र उष्णता, पावसाचा अनियमितपणा—हे सगळे काही अचानक घडलेले नाही. ही आपल्या अनेक वर्षांच्या कृतींची फळं आहेत. वाहनांचा वाढता वापर, कोळशावर आधारित वीज, औद्योगिक प्रदूषण आणि उपभोगप्रधान जीवनशैली यामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन झाले आहे.

    हा प्रश्न केवळ सरकार किंवा वैज्ञानिकांचा नाही; तो आपला सगळ्यांचा आहे.

    आपण सध्या कुठे उभे आहोत?

    भारताने अलीकडच्या काळात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. २०२६ पासून सिमेंट, अॅल्युमिनियम, कागद आणि रसायनांसारख्या मोठ्या उद्योगांना “कमी उत्सर्जन” करण्याची स्पष्ट लक्ष्ये देण्यात आली आहेत. जे उद्योग प्रदूषण कमी करतील, त्यांना आर्थिक फायदा मिळेल. यासाठी स्वतंत्र कार्बन क्रेडिट मार्केट सुरू होणार आहे.


    काही राज्ये या कार्बन क्रेडिट्समधून महसूलही निर्माण करत आहेत. दुसरीकडे, परदेशात निर्यात करणाऱ्या भारतीय उद्योगांना आता “आपण किती प्रदूषण करतो” याचा तपशील द्यावा लागत आहे. तरीही वास्तव हेच आहे की भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर कोळशावर अवलंबून आहे, आणि हीच गोष्ट आपल्या हवामान कामगिरीवर परिणाम करत आहे.

    नवीकरणीय ऊर्जा : आशेचा मार्ग

    या सगळ्या चित्रात नवीकरणीय ऊर्जा हा एक उज्ज्वल मार्ग आहे. सूर्य, वारा आणि पाणी—हे निसर्गाकडून मिळणारे स्वच्छ ऊर्जास्त्रोत आहेत. भारतात सौर आणि पवन ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढत आहे. २०३० पर्यंत आपल्या देशात तयार होणाऱ्या विजेपैकी मोठा हिस्सा स्वच्छ ऊर्जेतून मिळावा, हे आपले उद्दिष्ट आहे.

    आज घरांच्या छतावर सौर पॅनेल, गावांमध्ये सौर पंप, पवनचक्क्या आणि बॅटरी साठवणूक यांसारख्या गोष्टी हळूहळू सामान्य होत आहेत. पर्यावरणपूरक इमारती आणि पुनर्वापराचे साहित्य वापरल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

    पण यात आपण काय करू शकतो?


    इथेच सामान्य माणसाची खरी भूमिका सुरू होते.
    आपण रोज घेत असलेले छोटे निर्णयच मोठा बदल घडवतात.

    शक्य तिथे बस, ट्रेन, कार्पूल किंवा सायकलचा वापर करा.
    गरज नसताना दिवे, पंखे, चार्जर बंद ठेवा.
    ऊर्जा बचत करणारी उपकरणे वापरा.
    अन्न वाया घालवू नका, स्थानिक व हंगामी अन्न निवडा.
    पाणी जपून वापरा.
    अनावश्यक प्रवास आणि उड्डाण टाळा.
    हे उपाय सोपे वाटतात, पण ते मिळून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी करू शकतात.

    एकट्याने नाही, एकत्र

    आपण एकटे सगळं बदलू शकत नाही, पण एकत्र आलो तर नक्कीच बदल घडवू शकतो.
    स्थानिक पर्यावरण गटांमध्ये सहभागी होणे, मुलांशी व मित्रांशी या विषयावर बोलणे, समाजात चर्चा घडवून आणणे आणि मतदार म्हणून पर्यावरणपूरक धोरणांना पाठिंबा देणे—हीदेखील महत्त्वाची पावले आहेत.

    सरकारने २०३० पर्यंत स्वच्छ ऊर्जेवर भर देण्याचे ठरवले आहे. पण ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवायची असतील, तर शासन, उद्योग आणि आपण सगळे एकाच दिशेने चालायला हवे.

    महत्वाचा विचार

    कार्बन उत्सर्जन हा प्रश्न दूर कुठेतरी घडणारा नाही. तो आपल्या घरात, आपल्या सवयींत आणि आपल्या रोजच्या निर्णयांत दडलेला आहे.


    आज आपण थोडा बदल केला, तर उद्याच्या पिढीसाठी जग अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि राहण्यायोग्य राहील.
    लहान पावले घ्या—कारण तीच उद्याचा मोठा बदल घडवतात.

    हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर comment मध्ये नक्की सांगा. आजपासून पर्यावरणासाठी तुम्ही कोणता एक बदल करणार आहात?

    – प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी,

    M.E. (E&TC Engg), C-DAC,

    सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे

  • भावनेपेक्षा कर्तव्य का महत्त्वाचे? — गीतेच्या प्रकाशात आधुनिक जीवनाचा समतोल विचार

    मानवी जीवन भावना आणि कर्तव्य या दोन आधारस्तंभांवर उभे आहे. भावना माणसाला संवेदनशील बनवतात, तर कर्तव्य माणसाला स्थिर, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवते. आजचा माणूस भावनांनी अधिक चालवला जातो—अपेक्षा पूर्ण न झाल्या की तो निराश होतो, नाती तुटतात, जबाबदाऱ्या टाळल्या जातात. अशा काळात भावनेपेक्षा कर्तव्य का महत्त्वाचे आहे याचा विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी भगवद्गीतेचा संदेश आजही तितकाच कालातीत आणि मार्गदर्शक आहे.


    कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आपल्या आप्तस्वकीयांना पाहून भावनिक होतो. करुणा, मोह आणि भीती यामुळे तो शस्त्र खाली ठेवतो. त्या क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ योद्धा म्हणून नाही, तर एक मनुष्य म्हणून जागं करतात. ते त्याला सांगतात—
    “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
    मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥”
    (भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७)
    या श्लोकाचा अर्थ आजच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवतो. आज माणूस कर्म करण्यापेक्षा त्याच्या परिणामांवर अधिक केंद्रित आहे—पदोन्नती, पगार, मान्यता, सोशल मीडियावरील प्रतिसाद. परिणामी ताण, असमाधान आणि अस्थिरता वाढते. गीता मात्र सांगते—तुझे कर्तव्य नीट पार पाड; फळाची चिंता सोड.


    भावना नाकारणे नव्हे, तर संयम आवश्यक


    गीता भावना नाकारायला सांगत नाही; ती भावनांवर संयम ठेवायला शिकवते. भावना असणे मानवी आहे, पण त्यांच्याच आधारे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, दुखावलेल्या मनातून केलेली कृती किंवा कौतुक न मिळाल्याने कामाकडे पाठ फिरवणे—हे आजच्या समाजात सर्रास दिसते. म्हणूनच विवेकाने, कर्तव्याच्या चौकटीत भावना ठेवणे आवश्यक आहे.


    आजच्या माणसाने आत्मसात करावयाच्या गोष्टी


    आजच्या काळातील माणसाने गीतेतून खालील गोष्टी नक्कीच आत्मसात केल्या पाहिजेत—
    निष्काम कर्मयोग – परिणामाची अतिशय चिंता न करता प्रामाणिक प्रयत्न करणे.
    स्वधर्माची जाणीव – प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून तिचे कर्तव्य निभावणे. गीतेत सांगितले आहे—
    “श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्”
    म्हणजेच, स्वतःचे कर्तव्य अपूर्ण असले तरी ते दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
    जबाबदारी स्वीकारणे – चूक झाली तर पळ काढण्याऐवजी ती स्वीकारून सुधारणा करणे.
    संयम आणि शिस्त – भावना, वेळ आणि इच्छा यांवर नियंत्रण ठेवणे.


    पर्सनल जीवनातील सकारात्मक बदल


    व्यक्तिगत जीवनात कर्तव्यभावना स्वीकारली, तर नातेसंबंध अधिक स्थिर आणि प्रगल्भ होतात. पालक म्हणून कर्तव्य पाळले, तर मुलांवर चांगले संस्कार होतात. पती-पत्नीच्या नात्यात “मला काय मिळाले” यापेक्षा “माझे कर्तव्य काय” हा विचार आला, तर गैरसमज कमी होतात. आज अनेक नाती केवळ भावनिक अपेक्षांमुळे तुटतात; कर्तव्याची जाणीव त्या नात्यांना आधार देते.


    Professional जीवनातील ठळक बदल


    व्यावसायिक जीवनात कर्तव्यनिष्ठा हीच खरी ओळख ठरते. शिक्षकाने विद्यार्थ्यांप्रती, डॉक्टरने रुग्णांप्रती, कर्मचाऱ्याने संस्थेप्रती प्रामाणिकपणे कर्तव्य पाळले, तर विश्वास निर्माण होतो. कौतुक न मिळाले, प्रमोशन उशिरा झाले, तरी काम निष्ठेने करणे—हीच गीतेची शिकवण आहे. अशा वृत्तीमुळे करिअरमध्ये स्थैर्य, आत्मसन्मान आणि दीर्घकालीन यश निश्चितच मिळते.


    राम आणि कृष्ण : आजच्या काळासाठी आदर्श
    रामांनी पित्याच्या वचनासाठी वनवास स्वीकारला. भावनांनी त्यांनाही दुःख झाले, पण त्यांनी कर्तव्य सोडले नाही. कृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना मैत्रीपेक्षा धर्माला प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनातून आपल्याला हेच शिकायला मिळते की, कर्तव्य सोपे नसते, पण तेच माणसाला महान बनवते.


    उपसंहार


    आजचा खरा प्रश्न हा नाही की “मला काय वाटते?”
    तर खरा प्रश्न हा आहे की “माझे कर्तव्य काय आहे?”
    भावना माणसाला माणूस बनवतात, पण कर्तव्य माणसाला उंचावते. गीतेचा संदेश स्वीकारून जर आजचा माणूस कर्तव्यकेंद्रित जीवन जगू लागला, तर व्यक्तिगत आयुष्यात समाधान आणि व्यावसायिक आयुष्यात विश्वासार्हता नक्कीच निर्माण होईल. कर्तव्य पूर्ण केल्यानेच माणूस आत्मिक शांतता, सामाजिक सन्मान आणि जीवनाचे खरे पूर्णत्व प्राप्त करू शकतो—हा राम आणि कृष्ण यांच्या जीवनातून मिळणारा चिरंतन बोध आहे.

    – श्री सुरज दिलीपराव कुलकर्णी

  • कृत्रिम बुद्धिमत्ता: चुकीच्या वापरामुळे होणारे लपलेले धोके


    “थर्मोस्टॅटसारख्या साध्या मशीननाही काही प्रमाणात ‘समज’ असते. समस्या सोडवणाऱ्या बहुतेक मशीनमध्ये ही क्षमता आढळते.”
    — जॉन मॅकार्थी, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक


    कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) माणसासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पण ती योग्य पद्धतीने वापरली नाही, तर समाजाला मोठे नुकसानही होऊ शकते. डिझाइनमध्ये किंवा वापरात झालेल्या छोट्या चुका पक्षपात, गोपनीयतेचा भंग आणि सामाजिक धोके निर्माण करू शकतात. या लेखात अशा काही महत्त्वाच्या धोक्यांची सोप्या भाषेत चर्चा केली आहे.


    अल्गोरिदममधील पक्षपात


    AI प्रणाली डेटावरून शिकते. पण जर तो डेटा माणसांच्या चुकीच्या समजुतींनी भरलेला असेल, तर AI देखील तसाच पक्षपाती निर्णय देते. उदाहरणार्थ, काही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत AI ने महिलांना नाकारले, कारण जुना डेटा पुरुषांना जास्त प्राधान्य देणारा होता.


    कॅथी ओ’नील यांच्या Weapons of Math Destruction या पुस्तकात सांगितले आहे की असे डेटा-आधारित मॉडेल नोकरी, कर्ज आणि पोलिसिंगमध्ये असमानता वाढवतात. योग्य तपासणी केल्यास हे टाळता येऊ शकते, पण दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन नुकसान होते.


    स्वयंचलनामुळे नोकऱ्यांवर परिणाम


    AI मुळे अनेक कामे स्वयंचलित होत आहेत. कारखाने, कार्यालये आणि सेवा क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येत आहेत. योग्य प्रशिक्षण न दिल्यास लाखो लोक बेरोजगार होऊ शकतात.
    अहवाल दर्शवतात की कमी कौशल्याच्या नोकऱ्यांवर याचा जास्त परिणाम होतो आणि आर्थिक दरी वाढते. कौशल्य विकास कार्यक्रमांसह AI चा वापर केल्यास प्रगती आणि माणूस यामध्ये समतोल राखता येतो.


    गोपनीयता आणि देखरेखीचे धोके


    AI कॅमेरे, मोबाइल अ‍ॅप्स आणि इतर साधनांमधून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक माहिती गोळा करते. नियम कमकुवत असतील तर कंपन्या लोकांची परवानगी न घेता त्यांच्यावर नजर ठेवू शकतात. यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो.
    आरोग्य क्षेत्रात पक्षपाती AI मुळे गरीब आणि दुर्बल गटांना योग्य उपचार मिळत नाहीत. मजबूत कायदे असतील तर AI चा सुरक्षित वापर शक्य आहे.


    डीपफेकचा धोका


    डीपफेक तंत्रज्ञानामुळे खोटे व्हिडिओ किंवा आवाज तयार करता येतात. यामुळे खोट्या बातम्या वेगाने पसरतात.
    2023 मध्ये हाँगकाँगमध्ये एका कर्मचाऱ्याला बनावट CEO च्या व्हिडिओ कॉलद्वारे फसवून 25 दशलक्ष डॉलर्स पाठवायला लावले गेले. अशा प्रकारच्या घटना लोकशाही, निवडणुका आणि समाजातील विश्वासाला धोका पोहोचवतात.


    चुकीच्या माहितीचा प्रसार


    डीपफेकमुळे खरी आणि खोटी माहिती ओळखणे कठीण होत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा बनावट व्हिडिओ युद्धाच्या काळात सोशल मीडियावर पसरवण्यात आला होता.
    वृत्तपत्रांच्या मते, डीपफेक फाइल्सची संख्या 2025 पर्यंत 5 लाखांवरून 80 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तथ्य तपासणी साधने असली तरी AI चा वेग त्यापेक्षा जास्त आहे.


    सुपरइंटेलिजन्सबाबत इशारे


    अत्यंत प्रगत AI माणसांपेक्षा जास्त हुशार होऊ शकते. जर तिची उद्दिष्टे माणसांच्या हिताशी जुळली नाहीत, तर ती धोकादायक ठरू शकते.
    निक बॉस्ट्रॉम यांच्या Superintelligence या पुस्तकात अशा AI मुळे नेटवर्क हॅकिंग किंवा जगावर नियंत्रण मिळवण्याचा धोका सांगितला आहे. त्यामुळे आत्ताच जागतिक नियम बनवणे गरजेचे आहे.


    नैतिक मार्ग पुढे


    कॅथी ओ’नील आणि निक बॉस्ट्रॉम यांसारखे लेखक AI साठी चाचणी, पारदर्शकता आणि मानवी नियंत्रण यावर भर देतात. सरकारे पक्षपात आणि फसवणूक कमी करण्यासाठी तपासणी नियम लागू करत आहेत.
    प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून जबाबदार AI वापराबाबत शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे.


    इतर महत्त्वाचे धोके


    AI मुळे सायबर हल्ले, डेटा बिघडवणे आणि फसवणूक वाढत आहे. मोठ्या AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी खूप ऊर्जा लागते, ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.
    स्वयंचलित शस्त्रे अनियंत्रित हिंसाचार वाढवू शकतात. AI वर जास्त अवलंबून राहिल्याने मानवी कौशल्ये आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अनेक AI निर्णय “ब्लॅक बॉक्स” स्वरूपाचे असल्याने ते समजावून सांगता येत नाहीत, जे गंभीर क्षेत्रात धोकादायक ठरते.


    AI मधील धोके तंत्रज्ञानामुळे नाही, तर चुकीच्या निर्णयांमुळे निर्माण होतात. योग्य काळजी, नियम आणि नैतिकता पाळल्यास समाजाला AI कडून जास्त फायदे मिळू शकतात.


    — श्री. सुरज दिलीपराव कुलकर्णी

  • Artificial Intelligence: The Hidden Risks When Misused

    “Machines as simple as thermostats can be said to have beliefs, and having beliefs seems to be a characteristic of most machines capable of problem-solving performance.”
    — John McCarthy, Father of Artificial Intelligence

    Artificial intelligence promises great benefits but carries serious harms if not handled with care. Simple mistakes in design or use can lead to bias, privacy breaches, and even danger to society. This article explores these risks using facts from trusted sources.


    Bias in Algorithms

    AI systems learn from data, but if that data reflects human prejudices, the AI repeats those errors. For example, hiring tools have unfairly rejected women because past data favored men. Cathy O’Neil’s book Weapons of Math Destruction explains how such “big data” models widen inequality in jobs, loans, and policing. Proper data checks can fix this, but neglect causes lasting harm.



    Job Losses from Automation

    AI automates routine tasks, displacing workers in factories, offices, and services. Millions face unemployment without retraining plans. Reports show AI speeds market changes, hitting low-skill jobs hardest and growing economic gaps. Thoughtful rollout with skill programs helps balance progress and people.



    Privacy and Surveillance Threats

    AI scans vast personal data from cameras and apps, risking misuse by companies. Weak rules allow tracking without consent, eroding trust. In healthcare, biased AI worsens access for poor groups. Strong laws protect users while allowing safe AI use.



    The Danger of Deepfakes

    Deepfakes use AI to fake videos or voices, spreading lies fast. A 2023 Hong Kong scam tricked an employee into sending $25 million via a fake CEO video call. Another case saw a fake Pentagon explosion image crash stocks briefly. These tools harm elections and trust, as noted in AI ethics guides.



    Misinformation Spread

    Deepfakes fuel false news, confusing facts with fiction. A fake video of Ukraine’s President Zelenskyy urged surrender during war, shared widely online. Newspapers report rising fraud, with deepfake files jumping from 500,000 to 8 million by 2025. Fact-checking tools fight back, but speed of AI outpaces them.



    Superintelligence Warnings

    Advanced AI could outsmart humans, pursuing goals harmfully if misaligned. Nick Bostrom’s Superintelligence warns of uncontrolled systems hacking networks or reshaping the world. Without safety design, even helpful AI turns risky. Experts call for global rules now.



    Ethical Paths Forward

    Books like O’Neil’s and Bostrom’s stress testing, transparency, and human oversight. Governments push audits to cut bias and fraud. As a professor, focus on education builds responsible AI use.

    Other Critical Risks

    AI also fuels cybersecurity threats like data poisoning and AI-powered phishing, while training models guzzles energy harming the environment. Autonomous weapons risk unchecked killing, overreliance erodes human skills and mental health, and “black box” decisions lack explainability in critical fields.

    Conclusion

    AI harms stem from poor choices, not the tech itself. With care, rules, and ethics, society gains more than it loses.

    – Mr Suraj Deeliprao Kulkarni

  • Digital Clutter दूर करा: रोजची ५ मिनिटांची सोपी सवयी

    तुमच्या phone किंवा laptop वर emails, photos, files भरले आहेत का? Digital clutter म्हणजे नेहमी गोंधळ, files शोधायला वेळ आणि तणाव. पण काळजी नका करा! या सोप्या सवयी फक्त १०-१५ मिनिटे दिवसाला एका महिन्यात तुमचा digital world नीट होईल!

    📌 आधी समजून घ्या: Digital Clutter म्हणजे काय?

    Emails: ५०००+ जुन्या मेल्स, spam भरलेला inbox,
    Photos: Gallery मध्ये १०,००० blurry pics,
    Files: Downloads मध्ये गोंधळलेले PDF, zip files,
    Apps: Home screen वर ५०+ unused apps

    परिणाम: Phone slow, files सापडत नाहीत, तणाव!
    उपाय: रोज थोडं करा = सध्या नीट + भविष्य सुरक्षित

    १️⃣ सकाळची तयारी (२ मिनिटे) – का महत्वाचं?

    तयारी शिवाय काम यशस्वी होत नाही.

    Notifications बंद न केल्यास दर २ मिनिटाला ping येईल—ध्यान भंग होईल.

    काय करायचं?
    ✅ Phone + Laptop → Do Not Disturb (२ मिनिटांसाठी)
    ✅ Paper/Notes app मध्ये लिहा: “आज emails साफ करायचे”
    ✅ Tools उघडा: Gmail, Google Drive, Gallery
    ✅ Laptop (मोठे files), Phone (छोटे कामे)

    💡 खरं कारण: मन शांत झाल्यावर छोटं काम ५ सेकंदात होते!

    २️⃣ Emails साफसफाई (५ मिनिटे) – Inbox Zero ची गुरुकिल्ली

    Inbox का भरतो?

    Daily ५०+ emails येतात (shopping, newsletters) वाचले तरी delete/archive करत नाही

    परिणाम: १०,००० emails = panic!

    स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
    १️⃣ Search bar मध्ये “unsubscribe” टाका → पहिला १-२ spam बंद
    २️⃣ Ctrl+A (Select All) → २० जंक emails Delete
    ३️⃣ महत्वाच्या emails साठी Labels:
    ⭐ Urgent = आज उत्तर द्यायचं
    📂 Later = पुढच्या आठवड्यात बघायचं
    🗄️ Archive = माहितीसाठी जतन
    ४️⃣ Tasks → Google Calendar मध्ये पाठवा🎯 Target: Inbox मध्ये २० पेक्षा कमी emails
    टिप: Snooze = उद्या पुन्हा inbox मध्ये येतील

    ३️⃣ Files साफसफाई (५ मिनिटे) – Downloads चा गोंधळ संपवा

    Downloads folder का खतरनाक?

    PDFs, images, software downloads इथेच जमानाव समजत नाही = Desktop वर shortcuts Duplicates = १GB+ जागा वाया

    पूर्ण प्रक्रिया:
    १️⃣ एक folder निवडा: Downloads → पहिला १० files बघा
    २️⃣ Ctrl+F → File name टाका → Duplicates शोधा
    ३️⃣ Decision time:
    → “२०२६-बिले-जानेवारी” folder मध्ये move
    → “२०२६-काम” folder मध्ये move
    → ३ महिने जुने → Trash
    → महत्वाचे → Google Drive

    ४️⃣ Folder Properties → १०GB पेक्षा कमी ठेवा

    उदाहरण: receipt.pdf → “२०२६-बिले” folder मध्ये

    ४️⃣ Photos व्यवस्थापन (३ मिनिटे) – Gallery चा त्रास संपवा

    Gallery मधला problem:५०००+ photos = Phone slow Blurry/duplicate pics जागा खातात

    खास आठवणी सापडत नाहीत

    संपूर्ण मार्गदर्शन:
    १️⃣ Gallery app → पहिल्या ५० photos बघा
    २️⃣ १० blurry/duplicate pics → Delete
    ३️⃣ Folders:
    “कुटुंब २०२६”
    “Pimpri Trips”
    “Festival”
    ४️⃣ Google Photos → Upload → Free १५GB
    ५️⃣ Settings → Auto-backup On

    परिणाम: ५GB जागा मोकळी + खास आठवणी सहज सापडतील

    ५️⃣ Apps + Browser नीट करा (३ मिनिटे)

    Home screen का cluttered?
    Phone: ५०+ apps, गोंधळ
    Browser: ५०+ tabs openसहज उपाय:
    Phone Apps:
    ✅ Unused app uninstall
    ✅ Folders: “Daily” (WhatsApp), “Work” (Docs), “Bank” (UPI)Browser:
    ✅ Ctrl+W → ५ tabs बंद
    ✅ Ctrl+D → “Quick Links” bookmark (१० max)

    ६️⃣ रविवारी Backup Ritual (१० मिनिटे)

    Backup का जरुरी?
    Phone खराब झाल्यास → सगळे photos गमावाल
    Laptop format → Project files हरवतीलसंपूर्ण प्रक्रिया:
    १️⃣ USB Drive → Photos, Documents copy
    २️⃣ Google Drive → “Backup-२०२६” folder
    ३️⃣ Trash/Recycle Bin → Empty
    ४️⃣ Storage → २०% स्पेस वाढेल!

    🚀 ३० दिवसांत Results

    ✅ Files → १ मिनिटात सापडतील
    ✅ Inbox → नेहमी २० emails च्या आत
    ✅ Phone speed → २X faster
    ✅ तणाव → ५०% कमी

    आजपासून सुरू करा! पहिला habit कोणता?
    Comments मध्ये सांगा! 🎉

    प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी,

    M.E. (E&TC Engg), C-DAC,

    सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे

    #TechTips

    #Lifestyle

    #Productivity

  • मराठी भाषा संवर्धनाची काळाची गरज

    मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे. मातृभाषा म्हणून मराठीचा गौरव होणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. व्यक्तीच्या विचारांची मांडणी, भावना व्यक्त करण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास यामध्ये मातृभाषेचा मोठा वाटा असतो. मराठी भाषेमुळे आपली परंपरा, मूल्ये आणि जीवनशैली जतन होत राहते. म्हणूनच मराठी भाषा संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे.

    मराठी भाषेचा इतिहास अत्यंत समृद्ध असून संतसाहित्याने तिला वैचारिक उंची दिली आहे. संत ज्ञानेश्वरांनी “मराठीचे कौतुक इतुके करीन, अमृताहुनी जिंकेल” असे म्हणत मराठी भाषेचा अभिमानाने गौरव केला. संत तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी आपल्या अभंग, ओव्या आणि भारुडांमधून मराठीला लोकभाषेचे स्थान मिळवून दिले. या संतांच्या लेखनामुळे मराठी सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्यामुळे मराठी ही श्रद्धा, ज्ञान आणि अनुभवांची भाषा ठरली.

    मातृभाषा ही भावना, प्रेम आणि नातेसंबंध यांचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. कुटुंबातील संवाद मातृभाषेत झाल्यास आपुलकी, विश्वास आणि समज वाढते. माणूस आपल्या मातृभाषेत जितका सहज, स्पष्ट आणि प्रामाणिकपणे व्यक्त होतो, तितका तो इतर कोणत्याही भाषेत होऊ शकत नाही. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व अधिक सशक्त बनते. अशा सुदृढ व्यक्तिमत्त्वामुळे करिअरच्या संधीही अधिक व्यापक होतात.

    मराठी भाषेला अनेक थोर लेखक, कवी आणि नाटककारांनी समृद्ध केले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातून मराठीतील विनोद आणि संवेदनशीलता प्रकट होते. वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, विजय तेंडुलकर, शिवाजी सावंत यांनी समाज, माणूस आणि मूल्यांवर सखोल लेखन केले. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेचा शब्दसंग्रह आणि विचारविश्व अधिक व्यापक झाले. मराठी साहित्याने समाजप्रबोधनाची मोठी भूमिका बजावली आहे.

    आजच्या धावपळीच्या युगात काही लोक मराठी भाषेचा वापर टाळताना दिसतात. मातृभाषेकडे दुर्लक्ष होणे ही चिंताजनक बाब आहे. भाषेचा वापर कमी झाल्यास संवादातील दरी वाढते आणि गैरसमज निर्माण होतात. याचा परिणाम सामाजिक सलोखा आणि मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे मराठीचा दैनंदिन वापर जाणीवपूर्वक वाढवणे अत्यावश्यक आहे.

    मराठी पुस्तके वाचणे, कविता ऐकणे आणि संवाद साधणे यामुळे भाषेचे संवर्धन होते. वाचनामुळे विचारप्रक्रिया प्रगल्भ होते आणि भाषेवर प्रभुत्व मिळते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला शिक्षणात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अगदी अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणातही मराठीचा वापर प्रोत्साहित केला जात आहे. यामुळे ज्ञान अधिक सहज आणि परिणामकारक रीतीने आत्मसात होते.

    बालवयातील शिक्षण मातृभाषेत झाले तर मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास वेगाने होतो. मातृभाषेच्या मजबूत पायावर इतर भाषा शिकणे अधिक सोपे जाते. मराठी भाषेचा व्याकरणशुद्ध अभ्यास केल्यास भाषेची शुद्धता आणि सौंदर्य टिकून राहते. ज्ञानेश्वरी, दासबोध, ययाती, श्रीमान योगी, छावा यांसारखी ग्रंथसंपदा मराठीच्या वैचारिक संपन्नतेचे प्रतीक आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

    मराठी भाषा ही आपली अस्मिता, आपली मुळे आणि आपला आत्मा आहे. “भाषा टिकली तर संस्कृती टिकते” हा सुविचार मराठी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करतो. किमान घरात तरी मराठीचा वापर करून आपण भाषेप्रती आपले कर्तव्य निभावू शकतो. मराठीवर प्रेम करणे म्हणजे आपल्या संस्कृतीवर प्रेम करणे होय. म्हणूनच मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येक मराठी माणसाची सामूहिक जबाबदारी आहे.

    – प्रा. सुरज दिलीपराव कुलकर्णी, M.E. (E&TC Engg), C-DAC, सहाय्यक प्राध्यापक, JSPM चे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वाघोली, पुणे